– वनरक्षक जखमी; बुटाई बीटमधील घटना
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या बुटाई कॅम्प भाग- २ वन बीटमध्ये गस्त घालत असताना अस्वलाने वनरक्षकाच्या दुचाकीवर हल्ला केला. तसेच वनरक्षकाला हातावर व मांडीवर झडप घालून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सतीश देवराम शेंद्रे (३४) असे त्या अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
दुचाकीवर घातली झडप
बुटाई भाग- २ बीट कक्ष क्रमांक ३१८ मध्ये वनरक्षक सतीश शेंद्रे हे बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान गस्त घालण्यासाठी दुचाकीने एकटेच गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबतीला वनमजूर नव्हता. जंगलातील पायवाट रस्त्यांनी दुचाकीने जंगल भ्रमंती करीत असताना अस्वलाने दुचाकीवर झडप घातली. अस्वलाच्या हल्ल्यातून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अस्वलाने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर व उजव्या पायाच्या मांडीवर चावा घेऊन गंभीर दुखापत केली. तशाच अवस्थेत स्वतःला सावरत वनरक्षक शेंद्रे यांनी सुरक्षित स्थळी पायी पायी जात भ्रमणध्वनीद्वारे वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
जखमीला वेळीच मिळाले औषधोपचार
माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र बहुरे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठून जखमी वनरक्षकास स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने होणारा संभाव्य धोका टळला. जंगलामध्ये आता वन कर्मचाऱ्यांवर सुद्धा वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वन कर्मचारी सुद्धा धास्तावल्याचे चित्र आहे.






