spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गॅस दरवाढ व शेतकरी प्रश्नांवर भंडारा जिल्हा काँग्रेसचा ‘हल्लाबोल’; त्रिमूर्ती चौकात जोरदार निदर्शने

– जिल्हाधिकारी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन; केंद्रातील मोदी सरकारवर मोहन पंचभाईंचा कडाडून प्रहार

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असून, दुसरीकडे शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे होरपळून निघाला आहे. या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहरातील त्रिमूर्ती चौक येथे भव्य निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन पंचभाई म्हणाले की, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या असतानाही अनुदान देऊन घरगुती गॅस ४०० रुपयांत उपलब्ध करून दिला होता. मात्र, आज मोदी सरकारच्या काळात तो १००० रुपयांच्या पार गेला आहे. व्यावसायिक सिलेंडर २००० रुपयांवर गेल्याने हॉटेल व खानावळी बंद पडत असून मजूर बेरोजगार होत आहेत. सरकार जनतेची लूट करत आहे.”

निवेदनात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील निम्म्या शेतकऱ्यांची अद्याप धान खरेदीसाठी नोंदणी झालेली नाही. दोन महिन्यांपासून चुकारे प्रलंबित आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेला बोनस आणि ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन केवळ निवडणुकीपुरतेच ठरले आहे. जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून सप्टेंबर २०२५ ची अट रद्द करून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

कृषी पंपांना ८ तास वीज देण्याचे धोरण असताना प्रत्यक्षात केवळ ४ तास वीज मिळत आहे. यामुळे उन्हाळी पिके, मका आणि भाजीपाला धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पीक वाचवण्यासाठी १२ तास अखंडित वीज द्यावी. तसेच साखर कारखान्यांकडे थकलेली उसाची बिले आणि मजुरांसाठी ‘रोहयो’ची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव जियाभाई पटेल, जिल्हा महिला अध्यक्ष जयश्री बोरकर, जि.प. समाजकल्याण सभापती शितल राऊत, माजी सभापती रमेश पारधी, स्वाती वाघाये, जि.प. सदस्य सरिता कापसे, अनिता भुरे, गायत्री वाघमारे, प्रेमदास वनवे, देवा ईलमे, नम्रता बागडे, नगरसेवक कमल साठवणे, प्यारेलाल वाघमारे, धनराज साठवणे, कुंजीलाल कटरे, मनोज देशमुख, गजानन झंझाड, योगराज झलके यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.