– पारदर्शक प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; ३,७५८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची बहुप्रतिक्षित मैदानी चाचणी प्रक्रिया बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजेपासून उत्साहात सुरू झाली. पोलीस मुख्यालय, भंडारा येथील कवायत मैदानावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या चाचणीच्या पहिल्याच दिवशी ६८४ उमेदवारांनी आपला कस लावला. यामध्ये ४९६ उमेदवार पात्र ठरले असून १८८ उमेदवारांना अपयश आले आहे.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या भरती मोहिमेसाठी एकूण ३,७५८ उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत. आजपासून सुरू झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ६८४ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मैदानावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या संपूर्ण भरती प्रक्रियेचे मुख्य प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे हे स्वतः मैदानावर उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक कार्यरत आहे. उमेदवारांना कोणत्याही दडपणाशिवाय आणि पारदर्शक वातावरणात आपली शारीरिक क्षमता सिद्ध करता यावी, यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
निवड प्रक्रिया पूर्णपणे निर्दोष आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रत्येक चाचणीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले जात असून, निकालात कमालीची पारदर्शकता राखली जात आहे. मैदानावर उमेदवारांची ओळख पटवणे, कागदपत्र पडताळणी आणि अचूक शारीरिक मोजमापे घेण्यासाठी स्वतंत्र विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
पहिल्या दिवसाचा निकाल:
● एकूण सहभागी उमेदवार: ६८४
● पात्र (पास) उमेदवार: ४९६
● अपात्र (नापास) उमेदवार: १८८
अफवांना बळी पडू नका : पोलीस प्रशासनाचे आवाहन
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा अफवांना बळी न पडता आपल्या कष्टावर विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी विहित वेळेत उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन व भंडारा पोलीस दलाने सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




