हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील चार दिवसांच्या मैदानी चाचण्यांचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आला आहे. ही प्रक्रिया ११ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर पार पडली. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या थेट नियंत्रणाखाली ही संपूर्ण भरती मोहीम पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. या भरतीसाठी एकूण ३७५८ उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते, ज्यांची शारीरिक क्षमता चाचणी विविध टप्प्यांत घेण्यात आली.
भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी, ११ फेब्रुवारी रोजी ७७९ पुरुष उमेदवारांनी हजेरी लावली होती, त्यापैकी ४९६ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले. १२ फेब्रुवारी रोजी ८५४ पुरुष उमेदवारांपैकी ६१४ उमेदवारांनी यश मिळवले, तर १३ फेब्रुवारी रोजी ५८३ उमेदवारांपैकी ३८८ उमेदवारांनी पुढचा टप्पा गाठला. प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी, १४ फेब्रुवारी रोजी महिला उमेदवार, माजी सैनिक आणि तृतीयपंथी प्रवर्गातील ५१९ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ७६ उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, तर ४४३ उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक या चाचण्यांचे अत्याधुनिक उपकरणांद्वारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आले. चोख पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही निगराणीखाली पार पडलेली ही निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे. मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढील यादी आणि लेखी परीक्षेचे नियोजन लवकरच पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.