खापा, वार्ताहर :- विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि बौद्धिक कौशल्यांना वाव मिळावा, या उद्देशाने ‘यशोदीप बहुउद्देशीय मंडळ’ या संस्थेद्वारा संचालित ज्ञानसागर कॉन्व्हेंट स्कूलचे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संस्थेचा रौप्य महोत्सव (दि. १४) शनिवारला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन निमंत्रित प्रमुख पाहुणे आणि शाळेच्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वार्षिक उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक आणि संगीताच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी आणि प्रत्येक सादरीकरणासाठी शाळेच्या प्राचार्या शैलजा पारधी यांच्या मार्गदर्शनात नाजमीन शेख, रंजना आष्टनकर, सुवर्णा राऊत आणि प्रमोदीनी टेकमेकवार यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या शैलजा पारधी यांनी केले. संचालन शिक्षिका नाजमीन शेख यांनी केले तर, उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा इंदु सुधाकर गुजर यांनी मानले.




