हंसराज भंडारा :- आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयच्या (AI) युगात पाऊल टाकत भंडारा जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि त्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी ‘प्रोजेक्ट हॉक’ (PROJECT HAWK) हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आता जिल्ह्यातील गुन्हेगारांचे ‘डिजिटल मॅपिंग’ झाले असून, पोलिसांची नजर त्यांच्यावर चोवीस तास राहणार आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक मयंक माधव यांची संकल्पना तुमसर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव (IPS) यांनी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प विकसित केला आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी १५ जून २०२६ रोजी आयोजित गुन्हे आढावा बैठकीत मयंक माधव यांचा विशेष गौरव केला.
२९२३ कॅमेरे आणि १९१६ गुन्हेगारांवर नजर या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण २९२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. तसेच, जिल्ह्याच्या रेकॉर्डवर असलेल्या १९१६ गुन्हेगारांची त्यांच्या राहत्या पत्त्यानुसार डिजिटल नकाशावर नोंद करण्यात आली आहे. यामुळे एखादा गुन्हा घडल्यास, त्या परिसरातील सीसीटीव्ही आणि तेथे राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळणार आहे.
गस्ती दरम्यान होणार मोठा फायदा ‘प्रोजेक्ट हॉक’मध्ये खास फिल्टर्सचा वापर करण्यात आला आहे. पोलीस गस्तीवर असताना आपल्या मोबाईल किंवा टॅबद्वारे परिसरातील गुन्हेगारांची माहिती मिळवू शकतील. यामुळे संशयितांची तपासणी करणे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अधिक सोयीचे होणार आहे.
गुन्हेगारीमुक्त जिल्ह्यासाठी पाऊल भंडारा जिल्हा पोलिसांनी राबवलेला हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो. डिजिटल मॅपिंगमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे ‘डिजिटल अस्त्र’ अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.
‘काय आहे ‘प्रोजेक्ट हॉक? ‘
🔹 सीसीटीव्ही मॅपिंग (CCTV Mapping): जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवरील
कॅमेऱ्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करणे.
🔹 गुन्हेगार मॅपिंग
(Criminal Mapping): रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वास्तव्याची ठिकाणे डिजिटल नकाशावर नोंदवणे.







