नागपूर :- २१ सप्टेंबर रोजी, जागतिक अल्झायमर दिनानिमित्त भाऊसाहेब मूळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन व ‘विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम २६ सप्टेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष कलंबे, आंबुलकर व महिला अध्यक्षा अरसपुरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आ.प्रा.डॉ. युवराज काळे होते. यावेळी कायचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.सी. एस.तनमने तसेच स्वस्थवृत्त विभागाच्या प्रमुख डॉ. माधवी रेहपाडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, हाडांची घनता तपासणी (Bone Mineral Density Test), ECG, मोफत औषधे व तज्ज्ञांची सल्लामसलत उपलब्ध करून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
अल्झायमर रोग हा मुख्यत्वेकरून वृद्धावस्थेत होणारा एक स्नायविक विकार (Neurodegenerative Disorder) असून त्यात स्मरणशक्ती कमी होणे, निर्णयक्षमता घटणे, दैनंदिन कामकाज विसरणे व व्यक्तिमत्त्वात बदल होणे असे लक्षणे दिसून येतात. हा आजार पूर्णपणे बरा करता येत नसला तरी योग्य जीवनशैली, आयुर्वेदिक उपचारपद्धती, योग व वेळेवर निदान यामुळे त्याचे दुष्परिणाम कमी करता येतात. या उपक्रमा द्वारे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अल्झायमर विषयी जनजागृती होऊन आयुर्वेद व योगाच्या साहाय्याने निरोगी वृद्धत्व साध्य करण्याचा संदेश देण्यात आला.








