– मुख्यमंत्री ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाहीत रामदास तडस यांची खात्री !
– मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेणार
शिर्डी :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या राज्यस्तरावरील पदाधिकारी,राज्यातील पालक संघटना, युवा, सेवा व व्यापारी वकील, डॉक्टर आघाड्यांचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व सचिव, प्रमुख पदाधिकारी यांची श्रीक्षेत्र शिर्डी येथे विचारमंथन तातडीची सभा रविवार २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या सभेला राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनी हजर होते. संघटनेचे राज्य अध्यक्ष खा. रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत, शासनाने २ सप्टेंबर , २०२५ ला मराठा समाजाबाबत काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी. समाजावर घोर अन्याय होऊन, शासनाने ओबीसींचे पाठीत खंजीर खुपसल्याची भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रखरपणे सभेत व्यक्त केली. त्यामुळे हा शासन निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा व ओबीसी समाजाला न्याय द्यावा, तसेच श्री संताजी आर्थिक विकास महामंडळास पूर्ण स्वतंत्र दर्जा देऊन श्री परशुराम महामंडळाचे धर्तीवर अधिकार देऊन ५०० कोटींचे भाग भांडवल देण्यात यावे व शासकीय व अशासकीय पदावरील नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात तसेच समाजासाठी मुंबई येथे शासनाने एक भूखंड शासकीय दरात द्यावा, यासाठी तैलिक महासभेनी पुढाकार घेऊन अध्यक्ष रामदास तडस यांचे नेतृत्वात महासचिव डॉ भूषण कर्डिले (नाशिक), कार्याध्यक्ष गजुनाना शेलार (नाशिक), ज्येष्ठ उपाध्यक्ष अशोककाका व्यवहारे (चांदवड,) उपाध्यक्ष संजय विभुते (सांगली) कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे (नागपूर), व्यापार आघाडी. अध्यक्ष पोपटराव गवळी (बारामती), सुनील चौधरी (कल्याण), अतुल वांदिले (हिंगणघाट) या सर्वांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ घेऊन भेट घेण्याचे, तसेच तेली समाजाच्या व ओबीसीच्या समस्यांबाबत चर्चा करून मार्ग काढावा. असे सर्वानुमते ठरले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. यांनी अनेकदा ओबीसी वर अन्याय होणार नाही असे मत व्यक्त केले आहे. परंतु याबाबत ओबीसी समाज संभ्रमात व चिंतेत आहे. त्यामुळे या भेटीकडे राज्यातील ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे. या भेटीत समाधान न झाल्यास राज्यातील सर्व ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन या बाबत लढा द्यावा, यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेनी नेतृत्व करावे असेही या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले.








