spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खा. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करून ‘Z+’ सुरक्षा द्या; भीम आर्मीचे राष्ट्रपतींना निवेदन

– दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा

हंसराज, भंडारा :- भीम आर्मी संघटनेचे संस्थापक, आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर शाहाबाद येथील टोल नाक्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ (Z+) सुरक्षा प्रदान करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. एका विद्यमान खासदारावर आणि लोकप्रतिनिधीवर भरदिवसा अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून, ही केवळ एका व्यक्तीच्या सुरक्षेची बाब नसून देशातील लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि कायदा-सुव्यवस्थेवर झालेला आघात आहे, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

या निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, खा. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची कालबद्ध चौकशी करून यामागील सूत्रधार व कट रचणाऱ्यांचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे. तसेच हल्ल्यात सामील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. खा. आझाद यांच्या जीवितास असलेला संभाव्य धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना तात्काळ ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्यात यावी. केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्यास भीम आर्मीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

सदर निवेदन सादर करतेवेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे, जिल्हा महासचिव संजय वासनिक, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर मेश्राम, जिल्हा संघटक महेंद्र बनसोड, भंडारा तालुकाध्यक्ष चेतन काणेकर, पवनी तालुकाध्यक्ष शुभम लोणारे, अश्विन मेश्राम, सैय्यद जाफरी , रुलेश निम्मपांडे , संदेश बरडे, रितीक मेश्राम यांच्यासह भीम आर्मीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.