– बायसिकल असोसिएशन, आयएमए आणि फिट इंडिया मुव्हमेंटचा संयुक्त उपक्रम; जनजागृतीपर स्लोगन्सने वेधले लक्ष
हंसराज, भंडारा :- जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून भंडारा शहरात रविवारी, ७ जून रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’, ‘बायसिकल असोसिएशन भंडारा’ आणि ‘आय.एम.ए. भंडारा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत १४० हून अधिक सायकलपटूंनी सहभाग नोंदवत ‘प्रदूषण मुक्त व आरोग्यदायी भंडारा’ असा सामाजिक संदेश दिला.
दरवर्षी ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा सुटीचे औचित्य साधून ७ जून रोजी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी तब्बल १७८ सायकल प्रेमींनी नाव नोंदणी केली होती, त्यापैकी १४० सायकलपटू प्रत्यक्ष रॅलीत सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल भ्रमण करत या रॅलीने भंडाऱ्यात आरोग्याचा नवा विचार पोहोचवला.
सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती केवळ सायकल चालवणे हाच या रॅलीचा उद्देश नसून, पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक भान जपण्याचा प्रयत्नही यावेळी दिसला.
सहभागी सायकलपटूंनी आपल्या सायकलींवर ‘प्रदूषण मुक्त पर्यावरण’, ‘प्लास्टिक मुक्त शहर’ आणि ‘इंधनाची बचत’ असे विविध स्लोगन्स व सुविचार लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
विविध संस्थांचा सहभाग कार्यक्रमादरम्यान ग्राहक मंचच्या पदाधिकाऱ्यांनीही आपली उपस्थिती दर्शविली. त्यांनी उपस्थित सायकलपटूंना आणि नागरिकांना ‘एमआरपी’ (कमाल विक्री किंमत) बाबत कायद्याची माहिती देऊन ग्राहक म्हणून जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच, ‘अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्र’तर्फे पीयुष ठवरे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला, ज्यातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम या भव्य रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी फिट इंडिया मुव्हमेंटच्या जिल्हा प्रतिनिधी वैशाली गोमकाळे, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. प्रदीप मेघरे, सचिव डॉ. दुर्गेश पशीने यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच बायसिकल असोसिएशनचे अध्यक्ष पंकज हरडे, अमेय डोंगरे, गौरव सेलोकर आणि अमोल मानापुरे यांनी रॅलीचे नेटके नियोजन केले.
आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक जागरूकता यांचा त्रिवेणी संगम या रॅलीच्या माध्यमातून भंडाऱ्यात पाहायला मिळाला. या उपक्रमाचे शहरवासीयांकडून भरभरून कौतुक होत आहे.







