नागपूर प्रतिनिधी ता ३: नागपूर गुन्हे शाखा युनिट ३ ने ज्वेलरी शॉपमधून सोन्याची ब्रेसलेट चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही घटना ३० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७:१० ते ९:०० च्या दरम्यान घडली. फिर्यादी सूरज शंकरलाल कक्कड (वय ३३, रा. जलालपुरा, महाल, कोतवाली, नागपूर) यांच्या टांगा स्टँड, इतवारी, सराफा बाजार येथील कक्कड ज्वेलर्स या दुकानात एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने सोन्याचे ब्रेसलेट खरेदी करायचे असल्याचे सांगितले. दुकानाच्या कारागिराने त्याला दोन ब्रेसलेट दाखवले. ती हातात घालून तो क्रेडिट कार्ड आणतो असे सांगून बाहेर गेला आणि दोन्ही ब्रेसलेट घेऊन पळून गेला. या दोन्ही ब्रेसलेटची किंमत ४,३४,५२० रुपये होती. या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून आरोपीला अटक
गुन्हे शाखा युनिट ३ च्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि तांत्रिक तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मेडिकल चौक, व्ही.आर. मॉल परिसरात असल्याची खात्री झाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने चोरीची कबुली दिली.
आरोपीचे नाव शुभम परसराम डुकरे (वय २९, मूळ रा. भिसी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर, ह.मु. कीर्ती नगर, दिघोरी, नागपूर) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली ब्रेसलेट, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एम.पी ०९ यू.वाय २७३८) आणि मोबाईल फोन असा एकूण ५,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर काठोके, पोलीस हवालदार संतोषसिंह ठाकूर, विजय श्रीवास, पोलीस अंमलदार चंद्रशेखर डेकाटे, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, दीपक लाकडे, विशाल रोकडे आणि प्रमोद देशभ्रतार यांनी केली.
|
|



