– पाच सराईत गुन्हेगार हद्दपार; दोघांना दोन वर्षे, तिघांना एक वर्षाची हद्दपारी
– शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपारीचे आदेश; गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक प्रतिबंधात्मक कारवाई
कामठी :- कामठी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी नवीन कामठी पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पाच सराईत गुन्हेगारांना नागपूर शहर व नागपूर ग्रामीण परिसरातून हद्दपार करण्यात आले असून, यापैकी दोघांना दोन वर्षांसाठी, तर तिघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने नवीन कामठी पोलीस ठाण्याकडून संबंधित आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ६, नागपूर शहर यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले.
हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या पाच आरोपींमध्ये कपिल कुंदन रंगारी (वय २६) आणि सुमित ऊर्फ भोला रतन रंगारी (वय १९) यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तर अथर्व विक्रम मेश्राम (वय २१), शेख शमीम शेख सलीम (वय २२) आणि शेख नासीर शेख नजीर (वय २२) या तिघांना एक वर्षासाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामीण परिसरातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू व राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या आदेशानुसार नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक योगेश नालटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.






