spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गरूड चौकात दुचाकी डिव्हायडरला धडक; २७ वर्षीय रोहित धुर्वेचा मृत्यू

– बाजारातून कुटुंबीयांना ऑटोने घरी पाठवून स्वतः दुचाकीने निघाला; एसबीआय बँकेजवळ अपघात, आशा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केले मृत घोषित

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या  गरूड चौक परिसरात दिवाळीच्या आनंदावर विरजण घालणारी दुर्दैवी घटना घडली. दिवाळीच्या दिवशी बाजारातून कुटुंबीयांसाठी साहित्य खरेदी करून त्यांना ऑटोने घरी पाठविल्यानंतर स्वतः दुचाकीने स्वगृही जाणाऱ्या २७ वर्षीय युवकाचा डिव्हायडरला धडक लागून अपघाती मृत्यू झाला. रोहित कुमार धुर्वे (वय २७, रा. शिव मंदिर परिसर, जुनी कामठी) असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना काल सायंकाळी पाच दरम्यान घडली तर या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिवाळीच्या निमित्ताने मृतक रोहित धुर्वे हा आपल्या घरातील मंडळींसह कामठी बाजारात साहित्य खरेदीसाठी आला होता. बाजारातून दिवाळीचे साहित्य खरेदी केल्यानंतर त्याने कुटुंबीयांना ऑटोमध्ये बसवून घरी रवाना केले. आपण दुचाकीने मागून येतो, असे सांगून तो स्वतः दुचाकीने स्वगृही जाण्यासाठी निघाला.

दरम्यान, कामठीकडून स्वगृही जाण्यासाठी दुचाकीने निघाला असता नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गरूड चौकातील एसबीआय बँकेजवळ पे अकाउंट कार्यालयासमोर त्याच्या दुचाकीची डिव्हायडरला धडक झाली. या अपघातात रोहित गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने आशा हॉस्पिटल, कामठी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

दिवाळीच्या सणानिमित्त घरात आनंदाचे वातावरण असताना काही क्षणांतच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाजारातून कुटुंबीयांना सुरक्षित घरी पाठवून स्वतः दुचाकीने येणाऱ्या रोहितचा अपघाती मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरिय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.यासंदर्भात नवीन कामठी पोलिसानी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles