spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेशनच्या तांदळात मोठा घोटाळा? गोदामांची होणार तपासणी

– सदस्यीय समिती करणार गोंदियात चौकशी

गोंदिया जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम 2025-26 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या भरडाईनंतर जमा होणारा अतिरिक्त सीएमआर तांदूळ हा निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी मंत्रालय व विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. याचीच दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने आठ दिवसांत आपला चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे राईस मिलर्स तसेच पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?  

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केली जाते. त्यानंतर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार भरडाई करुन सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पुढे हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत राज्यातील इतर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. सन 2025-26 या खरीप हंगामात धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान भरडाई करुन सीएमआर तांदूळ जमा करण्यात आला. हा तांदूळ अमरावती, बुलढाणा, जालना व वाशिम, मुंबई आदी जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यासाठी जिल्हा जोडणी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

समितीला आठवडाभरात चौकशी अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातून सीएमआर तांदळाची उचल व वितरण करताना तांदळाच्या गुणवत्तेबाबत व पुरवठ्यासंबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी, लोकप्रतिनिधी संघटनांकडून शासनास तक्रारी करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक वितरण प्रणालीतर्गत पात्र लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचा व एफएक्यू प्रतिचा तांदूळ विहित कालावधीत मिळणे आवश्यक आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातून पुरवठा करण्यात आलेल्या तांदळाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्त नागपूर व संबंधित विभागाकडे करण्यात आल्या. याचीच दखल घेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यामधून उचल करण्यात आलेल्या तांदळाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींची तात्काळ चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी 1 ऑक्टोबर 2026 रोजी चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. तसेच या समितीला आठवडाभरात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.आज पासून गोंदिया जिल्ह्यात ही समिती येणार असून चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

Popular Articles