चंद्रपूर :-चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला असून पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरातील माजी नगरसेवक पितांबर कश्यप तसेच काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष भालचंद्र दानव यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यापूर्वीही माजी नगरसेवक मनोरंजन रॉय यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा कमळ हाती घेतला होता. विशेष म्हणजे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्या कार्यकाळात पितांबर कश्यप आणि भालचंद्र दानव हे काँग्रेसमध्ये अत्यंत सक्रिय होते. विविध आंदोलने, मोर्चे आणि संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका बजावली होती. त्यांच्या विरोधात काही प्रकरणे दाखल असूनही त्यांनी दीर्घकाळ काँग्रेसची साथ सोडली नव्हती. मात्र, चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रामू तिवारी यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आला.
रामू तिवारी हटवल्यानंतर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी
रामू तिवारी यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. या नाराजीचा पहिला मोठा परिणाम म्हणजे पितांबर कश्यप आणि भालचंद्र दानव यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक एकतेला मोठा धक्का बसला असून, त्याचे परिणाम आगामी काळात अधिक स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ रणनीतीची चर्चा
दरम्यान, भाजपकडून काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या गोटात खेचण्यासाठी सुनियोजित रणनीती राबवली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप काँग्रेसमधील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करत असून, आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेससाठी धोक्याची घंटा
या पक्षांतरामुळे काँग्रेसला केवळ संघटनात्मकच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात आणखी कोणते माजी नगरसेवक, पदाधिकारी किंवा प्रभावशाली नेते पक्ष सोडतात, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीपूर्वी वाढले राजकीय तापमान
एकूणच, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील फूट अधिक ठळकपणे समोर येत आहे. अशा परिस्थितीत आगामी महानगरपालिका निवडणूक अत्यंत रंगतदार, अटीतटीची आणि निर्णायक ठरणार, यात शंका नाही.








