Home Latest News डोळ्यांवर पट्टी तरीही अचूकता! ४४ सेकंदात ओळखले जगाचे चलन; ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करणाऱ्या...

डोळ्यांवर पट्टी तरीही अचूकता! ४४ सेकंदात ओळखले जगाचे चलन; ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करणाऱ्या देवांशला पोलीस अधीक्षकांची शाबासकी

0
26

हंसराज भंडारा :- लाखांदूर येथील चिमुरड्या देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळ्यांवर पट्टी बांधून केवळ ४४ सेकंदांत जगातील विविध देशांचे चलन आणि नाणी अचूक ओळखून ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित केला आहे. देवांशच्या या अद्भूत आणि विस्मयकारक कामगिरीची दखल घेत भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन (IPS) यांनी त्याचे विशेष कौतुक केले. १७ जून २०२६ रोजी देवांशने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता, त्याने आपल्या विलक्षण प्रतिभेचे जिवंत प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना थक्क केले.

या भेटीदरम्यान देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ (Mid-Brain Activation) तंत्राच्या मदतीने डोळे पूर्णपणे बंद असतानाही एकाग्रतेच्या जोरावर नाणी आणि नोटांची अचूक ओळख पटवून दिली. त्याची ही अफाट क्षमता पाहून पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आश्चर्य व्यक्त केले व या विशेष अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. एका लहान वयात जागतिक स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या देवांशचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

देवांशच्या या यशामागे त्याची मेहनत आणि पालकांचे प्रोत्साहन असल्याचे सांगत, पोलीस अधीक्षकांनी त्याला पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी देवांशचे वडील शिवशंकर कलंत्री उपस्थित होते. अवघ्या ४४ सेकंदांत जगाचे चलन ओळखणाऱ्या देवांशच्या या जागतिक विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याने भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.