spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा प्रियकर व बेकायदेशीर प्रसूती करणारा डॉक्टर जेरबंद

– भंडारा पोलिसांची मोठी कारवाई; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रियकराला आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना न देता मुलीची बेकायदेशीर प्रसूती करणाऱ्या गोंदियातील एका डॉक्टरला भंडारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मुकेशकुमार रूद्रकुमार मनसुरे (वय २२ वर्षे, रा. कुमारीकला, ता. लांजी, जि. बालाघाट) आणि डॉ. नितेश नरेंद्रकुमार बाजपेयी (वय ४० वर्षे, रा. गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी (वय १६ वर्षे ८ महिने) छत्तीसगडमधील बिजापूर येथे मजुरीसाठी गेली असताना तिची ओळख मुख्य आरोपी मुकेशकुमार याच्याशी झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही मुकेशकुमारने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून पीडिता सात महिन्यांची गरोदर राहिली.

डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेची प्रकृती बिघडल्याने आरोपीने तिला प्रसूतीसाठी गोंदिया येथील डॉ. नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात नेले. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही आणि पॉक्सो कायद्यानुसार अशा घटनेची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही, डॉ. बाजपेयी यांनी पैशांच्या हव्यासापोटी मुख्य आरोपीशी संगनमत केले. त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता मुलीची बेकायदेशीर प्रसूती केली.

वरठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत साकोली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा राऊत यांच्या फिर्यादीवरून भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (एम) (आय) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, २१ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सदर घटनेतील प्रसूतीचा प्रकार गोंदिया शहरात घडल्याने, कायदेशीर प्रक्रियेनुसार हा तपास गोंदियातील रामनगर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना सध्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष तपास पथकामध्ये सपोनि विवेक सोनवणे, सपोनि प्रतिभा राऊत, पोउपनि अजय मडावी, जयसिंग लिल्हारे, दिनेश अबाडारे, चेतन पोटे, शुमन ठाकरे, धनविजय गणवीर आणि दीपक वैरागडे यांचा समावेश होता.

Popular Articles