खापा, वार्ताहर :- व्ही. एस. पी. एम. अकॅडमी नागपूर द्वारा संचलित खापा स्थित जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत आपल्या महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय ९०.९० टक्के निकालासह खापा परिसरातील कला शाखेत अव्वल ठरलेले आहे. जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात ८९.६९ टक्के निकालासह दुसऱ्या क्रमांकावर तर नगरपरिषद राजेंद्र हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय ८५.७१ टक्के निकालासह कला शाखेतून तृतीय राहिले आहे.
जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कांचन मनोहर बिसरे हिने ८२.५० टक्के गुण प्राप्त करून खापा परिसरात अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी निरंजना भगवान किरणाके (खुबाळकर) हिने ८१% गुणासह द्वितीय व वंशिका जयपाल शेंडे हिने ८०.१७% गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ९९ विद्यार्थी बोर्ड परीक्षा २०२६ ला प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी ४ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेले असून २१ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशस्वी कामगिरीसाठी समाजाच्या सर्व स्तरावरून महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे कौतुक केले जात आहे. कला शाखेतून अव्वल ठरलेल्या बिसरे व द्वितीय व तृतीय स्थानावर राहिलेल्या किरणाके व वंशिका शेंडे यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील, प्राध्यापक व कठोर परिश्रमास दिले.
महाविद्यालयाच्या उत्तम निकालासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब भोगे, सचिव युवराज चालखोर, ॲड. बरेठिया, प्राचार्य सुधाकर गजभिये, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. प्राविण्यश्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.