spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोहारडोंगरी कोळसा प्रकल्प रद्द करा  – आमदार अभिजीत वंजारी यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई :- ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी कोळसा खाण प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार अभिजीत वंजारी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत केली. पर्यावरण, वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून सरकारने या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रकल्प रद्द करणार का? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

आमदार वंजारी यांनी सांगितले की, राज्यातील सर्वाधिक वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. विशेषतः सिंदेवाही तालुक्यातील विविध गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. २०२५ या वर्षात जिल्ह्यात ४७ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यापैकी बहुतांश घटना सिंदेवाही तालुक्यातील गावांमध्ये घडल्या आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

नागपूरच्या उमरेड-करांडला अभयारण्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापर्यंतचा परिसर हा वाघांच्या संचाराचा महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. या कॉरिडॉरमध्ये लोहार डोंगरी कोळसा प्रकल्पास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगत वंजारी यांनी चिंता व्यक्त केली. “जर या ठिकाणी खाण प्रकल्प सुरू झाला, तर वाघांच्या नैसर्गिक हालचालींना अडथळा निर्माण होईल. परिणामी, वाघ मानवी वस्त्यांकडे वळतील आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक नागरिकांचीही या प्रकल्पाला तीव्र विरोधाची भूमिका असल्याचे सांगत, लोकांच्या सुरक्षिततेचा आणि पर्यावरणीय समतोलाचा विचार करून सरकारने लोहारडोंगरी कोळसा प्रकल्पाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी आमदार वंजारी यांनी सभागृहात केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.