– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा खोचक सवाल
मुंबई :- मेट्रो 3 ची सेवा उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे उशिरा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार सलग असते तर चार वर्षापूर्वीच मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असती. चार वर्ष रखडलेला हा प्रकल्प देवाभाऊंनी सुरू केला. मेट्रो 3 मुळे मुंबईकरांना झालेला आनंद राऊतांना बघवत नाही का? असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईचा विकास कसा होत आहे, मेट्रो 3 कशी सुरू आहे, हे पाहण्यासाठी राऊतांनी सामना कार्यालयापासून बीकेसी पर्यंत मेट्रो तीन ने प्रवास करावा, वाटले तर राऊतांचे तिकीट मी काढतो, असा टोलाही बन यांनी लगावला.
“कॅबिनेट म्हणजे गुंडाची टोळी आहे” या राऊतांच्या टीकेचा समाचार घेत बन म्हणाले की, आज ज्यांना गुंड म्हणत आहेत ते सर्वजण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. तुमच्या सोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते सज्जन होते का ? असा बोचरा सवालही त्यांनी केला. रामदास कदम, योगेश कदम तुमच्यासोबत असताना ते योग्य होते. बाळासाहेबांच्या वारशावर चालणाऱ्यांना ‘गुंड’ म्हणणे म्हणजे ठाकरे घराण्याचा अपमान आहे, असेही बन यांनी सांगितले.
निजामाची राजवट उबाठा राजवटीत होती
निजामाची राजवट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या काळात होती असे टीकास्त्र बन यांनी सोडले. सर्वसामान्य माणसाला लुटणे, सर्वसामान्य माणसाकडून शंभर कोटींची वसुली करणे, एक कार्टून फॉरवर्ड केले म्हणून डोळा फोडणे, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बातमी दिली म्हणून घरी जाऊन पत्रकाराला अटक करणे याला निजामाची राजवट म्हणतात, असे बन म्हणाले.
रोहित पवारांच्या टँकरपासून व्यासपीठापर्यंत घायवळ आहे — तरी राऊत गप्प का?
रोहित पवार यांच्याबरोबर घायवळचे फोटो कालच सर्वांसमोर आणले आहेत. रोहित पवार यांच्या टँकरचे उद्घाटन असो किंवा प्रचार असो सर्वत्र घायवळ दिसतो. यावरून घायवळ कुणाचा कार्यकर्ता आहे, घायवळवर कोण मेहरबान आहे या सर्वांचे उत्तर महाराष्ट्राला मिळालेले आहे. गुंडांना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो आहे. घायवळ आणि रोहित यांच्याबद्दल श्री. राऊत मूग गिळून गप्प का आहेत असा सवालही बन यांनी केला.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर मुंबई दौ-यावर असताना त्यांचा अपमान करून उबाठा गट आणि राऊतांनी हीन राजकारणाची परिसीमा गाठली आहे अशी टीका बन यांनी केली. ‘अतिथी देवो भव’ ची आपली संस्कृती असताना आलेल्या पाहुण्यांना तुम्ही कुठल्यातरी गटामध्ये प्रवेश करणार आहात का असे विचारत हिणवणे ही कुठली तुमची संस्कृती ? असा परखड सवालही त्यांनी केला.
… हा तर रडारड मोर्चा
उबाठा गटाचा संभाजीनगर येथील उद्याचा हंबरडा मोर्चा म्हणजे फुकाची रडारड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 32 हजार कोटींची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना घोषित केली आहे. नांदेड जिल्ह्याबाबत महायुती सरकारने सुधारित शासन निर्णय त्वरेने काढत नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांना ही मदतीचा लाभ दिला आहे. त्यामुळेच संभाजी नगरमधील उबाठाचा मोर्चा म्हणजे निव्वळ नाटक आहे अशी टीकाही बन यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या राजवटीत बळीराजाच्या हाती भोपळा देण्यात आला होता असा सणसणीत प्रहारही त्यांनी केला. शेतक-यांना तुम्ही दमडीही दिली नाही त्या पापाची आधी कबुली द्या. ज्यांनी शेतक-यांच्या हाती भोपळा दिला, जे जनतेचे पैसे लाटून गब्बर झाले त्यांना भोपळ्याची भाषा करण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारपेक्षा तिपटीने अधिक मदत आत्ता अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना केली आहे असेही बन यांनी नमूद केले.




