किशोर साहू: मौदा, ता. २४ :- गुरुवार ( दि. 22 जानेवारी) ला प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे करिअर मार्गदर्शन चे आयोजन शिक्षक गुणरत्न गजभिये यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध शैक्षणिक तज्ञ व व्यवसाय मार्गदर्शक राम वाढीभस्मे प्रमुख वक्ते होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी च्या नंतरच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, सोबतच उच्च शिक्षणातील संधी, त्यासाठी मिळणारी शिष्यवृत्ती, द्यावयाची प्रवेश परीक्षा, वस्तीगृहाची माहिती दिली. पारंपरिक व आधुनिक तसेच नवनिर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, व्यावसायिक, क्रीडा , कैशल्य आधारित अभ्यासक्रम व रोजगाराची सांगड घालत त्या संबंधाने उपलब्ध असणारे विविध अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस चे फायदे हसत खेळत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड, भिती न ठेवता स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेऊन स्वकष्टाने कर्तुत्ववान, स्वावलंबी बनावे, भारत देशास आत्मनिर्भर बनवावे असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मोलाची पर्वणी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली. प्रमुख मार्गदर्शकांना शाळेतर्फे पुस्तक भेट देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एम. बाबुलकर, गुणरत्न गजभिये उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार शिक्षक राजू गेडाम यांनी केले. लिपिक सुनील डोंगरे, परीचर डोंगरे यांचे सहकार्य लाभले.




