सावनेर, प्रतिनिधी :- सावनेर तालुक्यात विविध ठिकाणी नागरिकांना १ रुपये प्रति लिटर दराने पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बनसोड यांनी नमूद केले आहे की, पिण्याचे पाणी हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आणि अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पाणी शुद्धीकरण केंद्रे आणि पाणी विक्री केंद्रांची सखोल तपासणी करण्यात यावी. तसेच पाण्याचा दर्जा, शुद्धतेची पातळी आणि प्रयोगशाळा चाचण्यांचे निष्कर्ष नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडले जावेत. यासोबतच प्रत्येक पाणी विक्री केंद्रावर पाण्याच्या नियमित तपासणीचे प्रमाणपत्र आणि अद्ययावत गुणवत्ता अहवाल दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे. यामुळे नागरिकांना मिळणारे पाणी सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार असल्याची खात्री मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. “स्वस्त दरात पिण्याचे पाणी उपलब्ध होणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, ते पाणी आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये,” असे मत हितेश बनसोड यांनी व्यक्त केले. दरम्यान, तालुक्यातील पाणी शुद्धीकरण केंद्रांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास दृढ करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबतची माहिती सार्वजनिक केल्यास नागरिकांना योग्य आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
१ रुपयांच्या पाण्याची गुणवत्ता तपासा; अहवाल सार्वजनिक करा – हितेश बनसोड यांची मागणी









