– शंखनाद न्यूज चॅनलचा ‘कोण बनेल शेफ नं. 1’ पाककला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
नागपूर :– कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी तब्बल ३ वेळा झुंज दिल्यानंतरही हार न मानणाऱ्या नीता अंजनकर यांनी पुन्हा एकदा विक्रम केला आहे. प्रसिद्ध मास्टर शेफ आणि कॅन्सर वॉरियर नीता अंजनकर यांनी ५६४ किलो कच्चा चिवडा बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. या आधी त्यांनी १००० – किलोची आंबील बनवून विक्रम केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी – आपल्या जिद्दीचा, संघर्षांचा आणि अचाट आत्मविश्वासाचा अनोखा प्रत्यय दिला आहे. हा विक्रम रचण्यापूर्वी फक्त आठवडाभर आधीच त्यांच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. तरीही त्यांनी न डगमगता, न थांबता हा चिवडा तयार केला.
महाराष्ट्र टेलीकम्युनिकेशन्स नागपूरच्या शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित ‘कोण बनेल शेफ नं. 1’ या पाककला स्पर्धेचे तिसरे पर्व नुकतेच उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी कॅन्सरवर मात करत पाककलेत विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी कच्चा चिवडा तयार करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले.

वाघमारे मसाले आणि २४ कॅरेट ऑईल प्रायोजित तसेच काॅन्फिडन्स ग्रुप आणि रचना कन्स्ट्रक्शन सहप्रायोजीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संचेती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे पार पडला.
या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाच्या अध्यक्ष ऋतुजा गडकरी उपस्थित होत्या. तसेच, वाघमारे मसालेचे संचालक प्रकाश वाघमारे, संचेती पब्लिक स्कूल व कॉलेजचे संचालक अमित येनुरकर, प्राचार्या बिंदू जोसेफ, प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर, एशिया बुक रेकॉर्डचे अडज्युकेटर सुनीता धोटे आणि निखिलेश सावरकर शंखनादच्या संचालिका राखी कुहिकर आणि संचालक व संपादक सुनील कुहिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सरवर मात करून पाककलेच्या विश्वात नवा अध्याय लिहिणाऱ्या प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी विदर्भाचे वैशिष्ट्य असलेल्या कच्चा चिवडा मोठ्या कढईत तयार करून विश्वविक्रम प्रस्थापित करून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली. यानिमित्त एशिया बुक रेकॉर्ड अडज्यूकेटर सुनीता धोटे व निखिलेश सावरकर यांच्या हस्ते त्यांच्या विक्रमाचा गौरव करण्यात आला. या चिवड्यामध्ये मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, दाळ, सेव, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिर्ची, लाल तिखट, मीठ, हळद, साखर आणि तेल यांचा समावेश होता. हा चिवडा वर्धा रोडवरील संचेती स्कूलच्या प्रांगणात बनवण्यात आला. जिथे अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या विक्रमाला साक्षीदार होण्याचा मान मिळवला.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, १३ सप्टेंबर रोजी, स्पर्धकांनी आपल्या घरून तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ सादर केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट पाककृतींना आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोनिया कृपलानी, द्वितीय क्रमांक रूपाली राऊत आणि रमा कुछवाह, तृतीय क्रमांक मंदा बागडे, एल. अनिता रामप्रसाद, आणि सोनिया साबळे यांना प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेचे परीक्षण विशाल चवरे, स्नेहल दाते, रिझवाना दिवाण, पूनम राठी, आणि मधुलिका चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश गोखले यांनी केले, तर आभारप्रदर्शन देवनाथ गंडाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात शंखनादचे विनोद अंभोरे, संजय कडवे, प्रवीण नन्नेवार, सनी भोंगाळे, सागर हाजरा, आश्लेषा भट, सृष्टी मौर्या, सचिन ढेंगरे, माला दोडके, प्रणव सातोकर राजेंद्र बिसेन, प्रताप काशीकर यांनी सहकार्य केले.








