spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना प्रारंभ

–  हर्जुना येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

– २,०८६ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

– विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी

– निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ :- महसूल विभागाच्या वतीने यवतमाळ तालुक्यातील हर्जुना येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाला हर्जुना मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुविंधांचा लाभ घेतला. या शिबिरात एकूण २,०८६ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. तसेच नागरिकांकडून अर्ज स्वीकारून त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अभियानाच्या जनजागृतीपर प्रभात फेरीने करण्यात आली. त्यानंतर शिबिराच्या उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अर्जुना ग्रामपंचायतीच्या सरपंच, यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख,, विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, तसेच ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार आणि तालुका कृषी अधिकारी पूजा गवई उपस्थित होत्या.

या प्रसंगी डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी शेतकऱ्यांना हंगामपूर्व शेती मशागतीबाबत आवश्यक खबरदारी, आधुनिक शेती पद्धती तसेच चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी महिलांशी संवाद साधत महिला सशक्तीकरण, महिला विषयक विविध कायदे तसेच महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

यानंतर कृषी विभागामार्फत “महाविस्तार ॲप” बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महसूल विभागाच्या विविध नवीन शासन निर्णय व धोरणांची माहिती तहसीलदारांनी उपस्थितांना दिली. तसेच विविध विभागांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात दाखल्यांचे वितरण करण्यात आले. डाक विभागाच्या वतीने त्यांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नागपूर येथून आलेले डॉ. ओंकार होलमोरे यांनी नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या शिबिरात नायब तहसीलदार रुपाली बेहरे यांनी विद्यार्थ्यांसाठी “प्रशासनाची तोंडओळख” हा उपक्रम राबवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.

या शिबिराला उपस्थित पंचक्रोशीतील अनेक गावांचे सरपंचांनी देखील या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या फायद्यांविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी शिबिराला भेट देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले आणि अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हर्जुनाचे मंडळ अधिकारी नितीन खरोडे, तसेच हर्जुना मंडळातील ग्राम महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles