spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकासाचा ‘रोडमॅप’ –  जयदीप कवाडे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६–२७ चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा आणि समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा आहे. शेतकरी कल्याण, लघुउद्योग, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक समतेचा विचार करून मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली आहे.

जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, अर्थसंकल्पात शेतकरी व ग्रामीण विकासाला दिलेले प्राधान्य विशेष उल्लेखनीय आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना आणि बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होईल. लघुउद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघुउद्योग केंद्रे उभारण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. १.२५ लाख उद्योजक आणि ५० हजार स्टार्टअप्स उभारण्याचे लक्ष्य हे राज्यातील उद्योग क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे आहे. बांबू विकास योजना तसेच मुंबई–पुणे सेवा केंद्र प्रकल्पामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्राला चालना मिळेल. तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकासावर दिलेला भरही सकारात्मक आहे. ४ लाख उच्चकुशल नोकऱ्या, गेमिंग स्टुडिओ आणि नवदिशा केंद्रे यामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असेही जयदीप कवाडे म्हणाले. जीसीसी केंद्रांच्या स्थापनेमुळे जागतिक उद्योगांशी राज्याचे नवे नाते निर्माण होईल. आरोग्य व शहरी विकासाच्या दृष्टीने आयुष्यमान योजनेचा विस्तार, मधुमेह निदान योजना आणि गरीबांसाठी घरे उभारण्याच्या घोषणा या समाजाभिमुख निर्णय आहेत. नागपूर रिंगरोड, मेट्रो विस्तार आणि विविध पायाभूत प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त विशेष समिती स्थापन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उभारणे आणि राज्यात ‘सामाजिक समरसता वर्ष’ साजरे करण्याची घोषणा ही सामाजिक समतेचा संदेश देणारी आहे. एकूणच, आर्थिक शिस्त, सामाजिक समता आणि विकासाची व्यापक दृष्टी यांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीचा मजबूत पाया ठरेल. पीपल्स रिपब्लिकन पार्टी सरकारच्या या विकासाभिमुख प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देईल, असे जयदीप कवाडे यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.