spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रा. रंजना कवाडे यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन भेट

आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. रंजना कवाडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवाडे कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वन केले. नागपुरातील लक्ष्मीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी रंजना कवाडे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली आणि कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

प्रा. रंजना कवाडे यांचे गेल्या महिन्यात नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरवादी चळवळ तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्या लाँग मार्चचे प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी होत्या. तसेच पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांना मातृशोक झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रंजना कवाडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले की, त्यांनी आयुष्यभर आंबेडकरवादी विचारसरणीशी निष्ठा राखत समाजकार्य केले. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. सामाजिक चळवळीतील त्यांच्या योगदानाची आठवण नेहमीच राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, कवाडे कुटुंबातील सुन प्रतिमा जयदीप कवाडे, नात नीरजा कवाडे, अस्मिता कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, विदर्भ अध्यक्ष विजय पाटील, नागपुर शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, नागपुर शहर कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी, नागपुर युवक आघाडी जिल्हाअध्यक्ष पलाश ठवरे, दक्षिण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल महल्ले, दक्षिण नागपुर विधानसभा अध्यक्ष प्रजोत कांबळे, दक्षिण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष श्रेयस गाडलिंगे, साहिल ठवरे, प्रवेश ठवरे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.