spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री साहेब होमगार्ड सैनिकांना कधी मिळणार वर्षभर काम ?

– 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतलेला निर्णय कायम करण्यात यावा ! 

– रुपेश वाळके यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ! 

मोर्शी :- पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देणारा होमगार्ड अजूनही उपेक्षित जिणे जगत आहे. अनेक वेळा मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे होमगार्डना कधी वर्षाचे ३६५ दिवस काम मिळेल? याची प्रतिक्षा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिलेली आश्वासने तत्काळ पूर्ण करून राज्यातील ५० हजार होमगार्ड सैनिकांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून केली आहे.

राज्यात ५० हजारांच्या वर होमगार्ड आहेत. जिल्ह्यातही त्यांची संख्या मोठी आहे. होमगार्ड पोलिसांना मदतीचे काम करीत असतात; परंतु शासनाकडून कायम त्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जातो. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सुरक्षेचे काम करीत असताना पोलिसांच्या तुलनेत अगदीच अत्यल्प मानधन त्यांना दिले जाते.

याबाबतीत अनेक वेळा होमगार्ड संघटनांकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. होमगार्डना कायम करण्यापासून मानधनात वाढीपर्यंत अनेक मागण्यात अनेक वेळा करण्यात आल्या. शासनानेही त्यांना आश्वासन दिले; परंतु ते कधीच पूर्ण केले नाही.

होमगार्ड हे पद अस्थाई आहे. त्यांना गरज पडेल, तसे कामावर बोलावले जाते. परंतु त्यांना नियमित काम दिले जात नाही. परिणामी घरखर्च भागेल इतकेही त्यांना उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे घर चालविणे कठीण बनत चालले आहे. त्यामुळे त्यांना जास्त मानधन देऊन नियमित काम देण्याची गरज आहे.

होमगार्ड संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. गणेशोत्सव, निवडणूक व इतर ठिकाणच्या बंदोबस्तावर वेळोवेळी बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांनी विधानसभेत होमगार्डच्या कामाच्या दिवसांमध्ये वाढ करून वेतनातही वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु ते काही अजून पूर्ण झालेले नाही. जे मानधन दिले जाते तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे राज्यातील हजारो होमगार्ड सैनिक संकटात सापडले आहे.

होमगार्ड सैनिकांना सतत 6 महिने काम मिळावे ही मागणी अगदी योग्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. अडचणीच्या काळात पोलिसांना, सुरक्षा दलाला होमगार्ड सैनिकांची प्रचंड मदत होत असते. त्यामुळे 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला होता तो कायम करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी विधानसभेमध्ये दिले होते. होमगार्ड यांच्यासाठी 350 कोटी तरतूद केली आहे ती पुन्हा कायम करण्यात येईल. दर 3 वर्षांनी नोंदणीचा करण्याचा जो नियम आहे तो रद्द करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होती ती पूर्ण करून राज्यातील ५० हजार होमगार्ड सैनिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Popular Articles