Home Latest News मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष : 86 रुग्णांना 80 लाखाचे सहाय्य

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष : 86 रुग्णांना 80 लाखाचे सहाय्य

0
134

 

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची यशस्वी वाटचाल

अनेक रुग्णांना मिळाला उपचार, शस्त्रक्रियेला आधार

योजनेत 22 रुग्णालये, 3 धर्मदाय रुग्णालयांचा समावेश

यवतमाळ, दि. १४  : गरीब व गरजू रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत व पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये हे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाला मूर्त स्वरूप देणारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना जिल्ह्यात प्रभाविपणे राबवली जात आहे. या योजनेतून 1 जानेवारी ते 30 जून या कालावधीत जिल्ह्यातील 86 रुग्णांना 80 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध झाला तर अनेकांचे प्राण देखील वाचले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गरजू रुग्णांना जिल्हास्तरावरच अर्ज दाखल करता यावा, त्रुटींची पूर्तता, अर्जाचा पाठपुरावा करता यावा यासाठी आता यवतमाळ येथेच मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुर्वी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना मुंबई जावे लागत असल्याने त्यांचा वेळ व पैशाचा अपव्यय व्हायचा. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सुरु करण्यात आला. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

मदत कक्ष योजनेंतर्गत अपघातजन्य शस्त्रक्रिया, मूत्रपिंड, लिव्हर प्रत्यारोपण, सांध्याचे प्रत्यारोपण, लहान मुलांच्या हृदयाचे आजार, हृदयरोग, किडनीचे आजार, डायलेसिस व कॅन्सरशी संबंधित शस्त्रक्रिया, किमोथेरेपी, अपघात, विद्युत जन्य अपघात इत्यादी रोगांवर उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. रुग्णांकडून फक्त आवश्यक कागदपत्र जसे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, वैद्यकीय अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी घेतली जातात. अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तसेच https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन करता येतात.

योजनेचा लाभ राज्यात निवास करणाऱ्या व एक लाख 60 हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना घेता येतो. लाभासाठी पात्र ठरलेल्या रुग्णांवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नोंदणीकृत रुग्णालयात उपचार केले जातात. या योजनेत एफसीआरए मान्यता असल्याने परदेशी संस्थांकडूनही निधी स्वीकारता येतो. यामुळे रुग्णांना अधिक जास्त मदत देणे शक्य होते. जिल्ह्यात या योजनेतून 1 जानेवारी ते 30 जून या कालावधीत 86 रुग्णांना 80 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. यवतमाळात कक्ष सुरु झाल्यापासून 42 रुग्णांना 36 लाख 22 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये 22 रुग्णालय व तीन धर्मदाय रुग्णालयांचा योजनेत समावेश आहे. धर्मदाय रुग्णालयांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींमुळे त्यांना दहा टक्के खाटा 1 लाख 80 हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी मोफत तर दहा टक्के खाटा 3 लाख 60 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यासाठी सीएमआरएफ कक्षाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते.

ट्राय पार्टाईट मॉडेल : तीन बाजूंनी मदत

या योजनेत रुग्णाच्या उपचार खर्चाचा काही हिस्सा कार्पोरेट कंपन्या, काही हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व उरलेली रक्कम रुग्णालय सवलतीच्या दरात किंवा मोफत सेवा देऊन केला जातो. उदाहरणार्थ दोन लाखांच्या उपचार खर्चापैकी 70 हजार रुपये कंपनी, 70 ते 80 हजार रुपये सरकार आणि उरलेली रक्कम रुग्णालय उचलते. यामुळे रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचार थांबवावे लागत नाहीत.