spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागरिकांकडून तीन दिवसांत ४ हजार ६१० किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान

– मनपाच्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाला उस्त्फूर्त प्रतिसाद

 नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी या अभियानाला नागपूरकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. मागील तीन दिवसात शहरातून तब्बल ४ हजार ६१० किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान स्वीकार केंद्रांवर जमा झाले आहे. या प्रतिसादातून नागपूरकरांनी शहर स्वच्छ ठेवण्याची आणि पुनर्वापराची संस्कृती जपण्याची आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. हे अभियान १२ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे मनपाद्वारे आवाहन केले आहे.

घरोघरी होणाऱ्या दिवाळीच्या साफसफाईतून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंनचा सुरक्षित आणि योग्य विल्हेवाट लागावी, तसेच त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात १०२ ठिकाणी ‘निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र’ सुरू केले आहेत. ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानामध्ये नागरिकांकडून तीन दिवसात एकून ४६१० किलो निरुपयोगी वस्तूचे दान करण्यात आले आहे. यामध्ये कपडे २२३७ किलो, पेपर आणि पुस्तके ८७२ किलो, प्लास्टिक वस्तू ७५० किलो, ई-वेस्ट २४९ किलो, घरगुती भांडी ८८ किलो, लाकडी वस्तू १११ किलो, इतर वस्तू ३०३ किलो असे तीन दिवसांत २ हजार १२७ नागरिकांनी या केंद्रांवर भेट देऊन दान दिले आहे.

निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र नागरिकांना त्यांच्या घरातील जुने फर्निचर, तुटलेले प्लास्टिकचे सामान, ई-कचरा आणि इतर निरुपयोगी वस्तू सोपवण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. यामुळे हा कचरा रस्त्यावर किंवा कचराकुंडीत न टाकता थेट मनपाकडे सुपूर्द करता येत आहे. ज्यामुळे शहराची स्वच्छता टिकून राहण्यास मदत होत आहे.

याचबरोबर ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत घरातील निरुपयोगी, पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू, जुने कपडे, गादी, ई-कचरा, प्लास्टिकच्या वस्तू, जुनी पुस्तके, वर्तमानत्रांची रद्दी, काचेच्या वस्तू आदी साहित्य मनपाच्या स्वीकार केंद्रावर जमा करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घर व सोसायटीच्या दारावर लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘थँक यू’चे स्टिकर्स दिले जात आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.