– नियोजनाचा अभाव आणि ढिसाळ प्रचारामुळे शासकीय उपक्रमाचा फज्जा
पांढरकवडा :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंतीनिमित्त अमरावती महसूल विभागात आयोजित करण्यात आलेला ‘ज्ञान माऊली’ हा तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम पांढरकवडा येथे पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांची नगण्य उपस्थिती असल्याने सभागृहातील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच पडून होत्या.
रविवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता साई मंदिर, आखाडा वार्ड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारासही मंडपात प्रेक्षकांची उपस्थिती अगदीच बोटावर मोजण्याइतकी होती. शासनाकडून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु, स्थानिक पातळीवर योग्य प्रसिद्धी न झाल्यामुळे आणि प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे हा उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचू शकला नाही.
एकीकडे संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा प्रसार करण्याचा उद्देश असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाला श्रोतेच नसल्याने आयोजकांवर रिकाम्या खुर्च्यांसमोरच कार्यक्रम पार पाडण्याची वेळ आली. या प्रकारामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असून स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.





