spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवीन वस्ती येथे तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

खापा, वार्ताहर :- खापा शहरातील नवीन वस्ती परिसरामध्ये सार्वजनिक नाली आणि गटारे तुंबल्याने नागरिकांना अत्यंत दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून गटारांची साफसफाई न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. या साचलेल्या पाण्यातून डासांची मोठी पैदास होत असून, लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

स्थानिकांनी याबाबत अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंकित मुंगोले यांच्या मार्गदर्शनात खापा नगर परिषदचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना भेटून शहरातील नाली व गटारे साफ सफाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

साथीचे आजार पसरण्याआधी प्रशासनाने तात्काळ या गटारांची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकित मुंगोले यांच्या सह काँग्रेसचे नगरसेवक नामदेव गजभिये, मिलिंद बुरडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष सिंग राठोड (मोनू), मुकेश पावडे, मनोज शेंडे, चेतन खुरसंगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

१) रस्त्याच्या कडेला साठत असलेल्या सांडपाण्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या घातक आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. नगर परिषदेने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन हा प्रश्न त्वरित निकाली काढावा.

– अंकित मुंगोले, सामाजिक कार्यकर्ते.

२) खापा नगरपरिषदेत गेले असता असे दिसून येते की, कोणत्याही कामासाठी ‘निधी उपलब्ध नाही’ असे प्रशासनाकडून तोंडी उत्तर दिले जाते. आज ‘गल्ली ते दिल्ली’ भाजपचे सरकार कार्यरत असतानाही, खापा नगरपरिषदेला स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.”

– नामदेव गजभिये, गटनेता तथा नगरसेवक.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.