Home Latest News काँग्रेस खासदार पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात : उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना,...

काँग्रेस खासदार पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात : उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना, नक्षलप्रभावित भागात सुरक्षा नसल्याचा आरोप

0
60

 

भंडारा १२ : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ काल सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात मोठा अनर्थ टळला. डॉ. पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फार्च्युनर (एमएच 36 एपी 9911) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेच्या वेळी खासदार स्वतः वाहनात होते. दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करून ते विमानाने मुंबईत दाखल झाले होते. तेथील कार्यालयीन काम आटोपून भंडाऱ्याकडे परतत असताना उमरेड फाट्याजवळ समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली. अपघात गंभीर स्वरूपाचा असला तरी खासदार पडोळे व त्यांच्यासोबत प्रवास करणारे सहकारी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये चिंता पसरली होती.

सुरक्षा न मिळाल्याची खंत
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मोठा भाग नक्षलप्रभावित आहे. अशा भागात असूनही शासकीय सुरक्षा उपलब्ध करून न दिल्याची खंत खासदार पडोळे यांनी व्यक्त केली. भाजप सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. पडोळे यांच्या जखमा सौम्य असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी “सरकारला आता तरी जाग येईल का?” असा सवाल उपस्थित केला आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वाहन रस्त्याच्या कडेला हलवले असून पुढील चौकशी सुरू आहे.