हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मुकुंद साखरकर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तसेच युवा पिढी मध्ये नवचैतन्य संचारले आहे. “जिल्ह्यातील निष्ठावान, अनुभवी जुन्या नेत्यांना सोबत घेऊन आणि तरुणांची मोठी फळी उभी करून काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस मिळवून देऊ,” असा विश्वास साखरकर यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, येत्या काळात अनेक दिग्गज नेत्यांची ‘घरवापसी’ होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
नवनियुक्त अध्यक्ष मुकुंद साखरकर सध्या संपूर्ण जिल्ह्याचा झंझावाती दौरा करत आहेत. ठिकठिकाणी ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेत आहेत. एका विशेष भेटीत त्यांनी आपली पुढील रणनीती स्पष्ट केली.
पारदर्शक प्रक्रियेतून निवड साखरकर यांची निवड राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘सृजन संघटन’ मोहिमेद्वारे झाली आहे. काँग्रेस निरीक्षक संगीता बेनीवाल यांनी जिल्ह्यात मुक्काम ठोकून प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्या नंतर च साखरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अवघ्या ३२ व्या वर्षी ही मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि खासदार डॉ. प्रशांत पडोले यांचे आभार मानले आहेत.
मंगळवार ठरणार ‘जनता दरबार’ केवळ पदावर बसून न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याचा संकल्प साखरकर यांनी केला आहे. “प्रत्येक मंगळवारी मी स्वतः दोन तालुक्यांचा दौरा करणार आहे. तिथे कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासोबतच सामान्यांचे प्रश्न ऐकून घेणार आहे. तहसील कार्यालयांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य असेल,” असे त्यांनी सांगितले.
मोठ्या नेत्यांची लवकरच ‘घरवापसी’ गेल्या काही काळापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी साखरकर यांनी कंबर कसली आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत जे नेते नाराज होऊन बाहेर पडले होते, ते आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत. “लवकरच जिल्ह्यात मोठी घरवापसी पाहायला मिळेल. एक माजी आमदारही लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, योग्य वेळी त्यांचे नाव जाहीर करू,” असा मोठा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
या नव्या नेतृत्वामुळे भंडारा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये ‘तरुण जोम आणि अनुभवाची साथ’ असे समीकरण पाहायला मिळत असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येतील, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.