spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माझ्याविरोधात सातत्याने कटकारस्थान रचले जात आहे – तुकाराम मुंढें

नागपूर :- नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर तुकाराम मुंढे यांनी आपले मौन सोडले आहे. अधिवेशन संपल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुंढे यांनी नाव न घेता आमदार खोपडे यांच्यावर जोरदार टीका केली.

“काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्याविरोधात सातत्याने कटकारस्थान रचले जात आहे,” असे स्पष्ट म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हिवाळी अधिवेशनात आमदार खोपडे यांनी लक्षवेधी मांडत तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेत कार्यरत असताना अधिकार नसतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पात हस्तक्षेप केला, तसेच अयोग्य कंत्राटदारांना धनादेश वितरित केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात तब्बल २० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी सभागृहात केला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, आमदार खोपडे यांनी मुंढे समर्थकांकडून आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केल्याने वाद अधिकच चिघळला.

या पार्श्वभूमीवर सरकारकडून मुंढे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर मुंढे यांना क्लिन चिट देण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, तरीही त्यांच्याविरोधातील आरोप थांबले नसल्याची खंत मुंढे यांनी व्यक्त केली.

एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? मी नागपूरमध्ये काम करत असताना नियमबाह्य कामांना विरोध केला. त्यामुळे काही लोक नाराज झाले आणि माझ्याविरोधात वारंवार तेच आरोप केले जात आहेत, असे मुंढे म्हणाले. चौकशीत निर्दोष आढळूनही पुन्हा पुन्हा आरोप होणे हे हेतुपुरस्सर असल्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, खोपडे यांनी केलेल्या आरोपांवरून प्रशासन आणि राजकारणातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकीकडे आमदारांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले असताना, दुसरीकडे सरकारकडून क्लिन चिट मिळाल्यानंतरही अधिकारी सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.