नागपूर :- डिजिटल युगाच्या दिशेने वाटचाल करताना वीज क्षेत्रात सुरू असलेल्या तांत्रिक बदलांचा स्वीकार करण्यास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील ग्राहकांनी आता मनापासून सुरुवात केली आहे. स्मार्ट मीटरबाबत समाजात पसरलेल्या काही गैरसमजांना आणि अफवांना छेद देत, महावितरणने राबवलेल्या व्यापक संवाद मोहिमेला ग्राहकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून केवळ आठवड्याभरात 6 हजारांहून अधिक ग्राहकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवून घेतले आहे, ही बाब वीज क्षेत्रातील या बदलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडलात (Zone) स्मार्ट मीटरच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ग्राहकांच्या शंकांचे पूर्णपणे निरासन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. याच धर्तीवर ८ जुलैपासून परिमंडलात एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. नागपूर ग्रामीणचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर शहरचे अधीक्षक अभियंता प्रफुल्ल लांडे आणि वर्धाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एकाच दिवशी तब्बल 200 ठिकाणी बैठका आणि शिबिरे आयोजित केली. या शिबिरांचा मुख्य उद्देश ग्राहकांच्या मनात असलेली भीती घालवून त्यांना स्मार्ट मीटरचे फायदे पटवून देणे हा होता.
या शिबिरांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या आणि महावितरणच्या हिताचे कसे आहे, हे सविस्तर स्पष्ट केले. स्मार्ट मीटरमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन बिलामध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल, तसेच ग्राहकांना आपल्या दैनंदिन वीज वापराची माहिती अधिक अचूकपणे मिळेल, असे पटवून देण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्मार्ट मीटर धारकांना टीओडी (ToD) म्हणजेच ‘टाइम ऑफ डे’ सवलतीचा लाभ मिळणार असून, त्यानुसार त्यांना प्रति युनिट 85 पैशांपर्यंतची बचत करता येणार आहे, ही बाब ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक ठरली. याशिवाय, भविष्यात वीज बिलासंदर्भात काही तक्रार असल्यास ती तात्काळ सोडवली जाईल आणि स्थानिक उपविभागीय स्तरावरच सर्व तांत्रिक अडचणींचे निरासन केले जाईल, अशी ठोस हमी महावितरणने ग्राहकांना दिली आहे.
महावितरणच्या या पारदर्शक आणि संवादशील भूमिकेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला असून, जे ग्राहक सुरुवातीला स्मार्ट मीटरला विरोध करत होते, त्यांनी आता स्वेच्छेने मीटर बसवण्यास संमती दिली आहे. या सकारात्मक बदलामुळे गेल्या आठवड्याभरात तब्बल 6 हजार 55 ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. यासह आता परिमंडलातील एकूण स्मार्ट मीटरची संख्या 7 लाख 59 हजार 57 वर पोहोचली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 6 लाख 8 हजार 446 तर वर्धा जिल्ह्यातील 1 लाख 51 हजार 263 ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित ग्राहकांच्या घरीही टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागपूर परिमंडल डिजिटल वीज वितरण व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. ग्राहकांचा हा वाढता पाठिंबा भविष्यातील स्मार्ट ग्रिडच्या स्वप्नाला बळ देणारा ठरत असून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यास महाविततरण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिली आहे.








