spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वीजचोरी प्रकरणात थकबाकीचा भरणा; न्यायालयीन सुनावणीत महावितरणची सकारात्मक भूमिका

नागपूर :- मौजा झूनकी, ता. कळमेश्वर येथील वीजचोरी प्रकरणात संबंधित ग्राहकाने ₹8,58,820 इतक्या वीजचोरीच्या देयकाचा भरणा केल्यानंतर झालेल्या न्यायालयीन सुनावणीत महावितरणने नियमानुसार नवीन वीजजोडणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे.

दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी मौजा झूनकी, ता. कळमेश्वर येथील मुदशीर अली मुसबीर हुसेन (ग्राहक यांच्या ठिकाणी वीजचोरी आढळून आली होती. ही कारवाई महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोशन शेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता दिनेश संसारे व सहाय्यक अभियंता मयुरी बेरड यांनी केली. यावेळी. सावजी मेश्राम व योगेश्वर ठाकरे हेही कारवाईदरम्यान उपस्थित होते. चोरी पकडल्यानंतर ग्राहकाने वीजचोरीची रक्कम व दंड न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

या प्रकरणात आकारण्यात आलेल्या ₹8,58,820 रकमेचा भरणा संबंधित ग्राहकाने दि. 10 जुलै 2026 रोजी सहाय्यक अभियंता, कळमेश्वर उपविभाग कार्यालयात केला असून त्याची नोंद न्यायालयात सादर करण्यात आली.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान महावितरणने स्पष्ट केले की, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पुनर्जोडणीसाठी अर्ज करून आवश्यक शुल्क भरल्यास पूर्वीची वीजजोडणी पुन्हा सुरू करता येते. मात्र, संबंधित ग्राहकाने विहित मुदतीत पुनर्जोडणीसाठी अर्ज न केल्याने संबंधित वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित (Permanent Disconnection) श्रेणीत वर्ग झाली आहे. त्यामुळे नियमानुसार पूर्वीची वीजजोडणी पूर्ववत करणे शक्य नसल्याचे न्यायालयास सांगण्यात आले.

तथापि, ग्राहकाला वीजपुरवठा लवकर मिळावा यासाठी महावितरणने सकारात्मक भूमिका घेतली असून, नवीन वीजजोडणीसाठी आवश्यक मागणी रक्कम भरून सर्व औपचारिकता पूर्ण होताच अवघ्या 3 ते 4 दिवसांत नवीन वीजजोडणी देण्यात येईल, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.

महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, वीजचोरी टाळावी, नियमांचे पालन करावे आणि वीजजोडणी किंवा पुनर्जोडणीसाठी विहित कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावे.

Popular Articles