spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पौष्टिक आहाराचा संदेश देत पाककला स्पर्धा उत्साहात

नागपूर :- पोषण सप्ताहाच्या निमित्ताने नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे ‘पाककला स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संतुलित आहार, पौष्टिक अन्न व निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील २९ विद्यार्थी तसेच १५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहभागींकडून पौष्टिक, चविष्ट व नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ सादर करण्यात आले.

चव, पौष्टिकता, आकर्षक मांडणी, सर्जनशीलता व आरोग्यदायी घटकांचा वापर या निकषांवर पदार्थांचे परीक्षण करण्यात आले. राज्य पोषण ब्युरो, नागपूरच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. रंजना राठोड प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे, डॉ. स्नेहा कुबडे रस शास्त्र विभागप्रमुख डॉ. माधवी रेहपाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. पौष्टिक आहारही चविष्ट व आकर्षक असू शकतो, तसेच आयुर्वेदातील आहार संकल्पनेतून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे शक्य आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. माधवी रेहपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ममता तलमले, डॉ. ओमप्रकाश गुल्हाने, डॉ. शरयू गजापूरे, डॉ. रुपाली भनारे व डॉ. स्नेहल भामकर तसेच विभागातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी व महाविद्यालयातील विविध विभागांनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.