spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सीपी राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती; पोटनिवडणुकीत ४५२ मतांनी मिळवला विजय, बी. सुदर्शन रेड्डी १५२ मतांनी पराभूत

 

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवार सी. पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांनी मोठा विजय मिळवत देशाचे १५ वे उपराष्ट्रपती होण्याचा मान मिळवला. राधाकृष्णन यांना प्रथम पसंतीची ४५२ मते मिळाली, तर विरोधक इंडी गठबंधनाचे उमेदवार व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांना फक्त ३०० मते मिळाली. अशा प्रकारे राधाकृष्णन यांनी १५२ मतांच्या फरकाने विजय मिळवला. निकाल जाहीर होताच एनडीएमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.

धनखडांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक
गेल्या महिन्यात तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीची गरज निर्माण झाली. एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार केले, तर विरोधी इंडी गठबंधनाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विश्वास दाखवला.

७६७ खासदारांनी दिली मते
९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं ५ या वेळेत संसद भवनात मतदान झाले. लोकसभा व राज्यसभा मिळून संसदेत एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या ७ जागा रिक्त असल्याने ७८१ खासदारांना मतदान करायचे होते. त्यापैकी १४ खासदारांनी मतदान केले नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७ व अकाली दलाचे ३ खासदार होते. एकूण ७६७ खासदारांनी मतदान केले. यापैकी एनडीएचे ४२७ खासदार होते.

१४ खासदारांनी केली क्रॉस व्होटिंग!
अधिकृत आकडेवारीनुसार, राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. १५ मते अवैध ठरली. भाजपच्या एकूण ४२७ मतांव्यतिरिक्त वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार एनडीए उमेदवारांच्या बाजूने उभे राहिले. अशा प्रकारे आकडा ४३८ झाला. उर्वरित १४ मते विरोधी गटातून मिळाली, म्हणजेच विरोधकांच्या १४ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली.

सीपी राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात झाला. विद्यार्थी जीवनात ते टेबल टेनिसचे विजेते होते. वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडून राजकारणात प्रवेश केला व १९८० मध्ये भाजपमध्ये दाखल झाले.

१९९८ व १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत कोयंबत्तूरमधून ते खासदार म्हणून निवडून आले. संसदेत वस्त्रोद्योग, वित्त आणि सार्वजनिक उपक्रम समित्यांवर सक्रियपणे काम केले. २००३ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

संगठनात्मक राजकारणात ते २००४ ते २००७ दरम्यान तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. या काळात सुमारे १९,००० किमीची ‘रथ यात्रा’ काढून जनजागृती केली. ते केरल भाजपचे प्रभारीही राहिले.

प्रशासनिक कारकिर्दीत २०१६ ते २०२० दरम्यान ते कॉयर बोर्डचे अध्यक्ष होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. काही काळ त्यांनी तेलंगणा व पुडुचेरीचे अतिरिक्त प्रभारही सांभाळले. ३१ जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.