हंसराज, भंडारा :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्यासाठी भंडारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कंबर कसली आहे. याच अनुषंगाने गुन्हेगारी कारवायांमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या विश्वा उर्फ बग्गा रामकृष्ण गाते (वय २३, रा. राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, भंडारा) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची जिल्हा कारागृह, यवतमाळ येथे रवानगी करण्यात आली.
विश्वा गाते याच्याविरोधात सन २०२४ पासून भंडारा पोलीस ठाण्यात तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शस्त्र अधिनियम, एमडी व गांजा या अमली पदार्थांची विक्री, हत्याराने गंभीर दुखापत करणे, चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे आणि मारहाणीचा समावेश आहे. तो नेहमी गुन्हेगारी टोळक्यासोबत वावरत असल्याने परिसरातील शांततेला बाधा निर्माण होऊन नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले होते.
वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा न झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, भंडारा यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाच्या पडताळणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा आदेश पारित केल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
कायद्याचा धाक निर्माण करून नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता समाजविघातक प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा ठाम निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोउपनि रोशन ओकटे, सफौ रोशन गजभिये आणि पोलीस अंमलदार अंकोश पुराम, संदीप बबावले, रोहन काळे व सुमित पेशने यांनी यशस्वीरित्या पार पाडली.






