◼️वाघाच्या मृतदेह शेतात पुरवल्याची कबुली
◼️शेतकऱ्याविरुद्ध वनगुन्हा दाखल
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील गुगलडोह हे जंगलांची गाव आहे. अनेकदा या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असतो. जंगली प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी शेतात विद्युत प्रवाह सोडतात. लावलेल्या तारांच्या कुंपणात अवैधरीत्या विद्युत प्रवाह सोडल्याने वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रामटेक वनपरिक्षेत्रातील गुगलडोह येथे घडली. कुंपणात अडकून वाघाचा मृत्यू झाल्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह पुरल्याची कबुली शेतकऱ्याने दिली असून, त्याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागपूर वनविभागांतर्गत रामटेक उपवनक्षेत्रातील घोगरा क्षेत्रात ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने गुगलडोह येथे रविशंकर रामधर जिझोते (वय ४८) यांची चौकशी केली. शनिवार (दि.२१) नोव्हेंबर ला आपल्या शेतातील भूमापक क्रमांक २३१ मध्ये खुंट्या गाडून जीआय तारांचे कुंपण तयार केले होते. त्यात अवैधरीत्या विद्युतप्रवाह सोडल्याची माहिती त्यांनी दिली. (दि.२२) ला सकाळी ८ ते ८.३० वाजता शेतात पाहणी केली असता कुंपणात वाघ मृतावस्थेत आढळला. त्यानंतर भीतीपोटी मृतदेह विहिरीजवळील शेताच्या धुऱ्यावर खड्डा खोदून पुरल्याची कबुली त्यांनी दिली. एनटीसीएच्या कार्यपद्धतीनुसार मृत वाघाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. यावेळी नागपूरच्या उपवनसंरक्षक डॉ. वनिता व्यास, सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे, मानद वन्यजीव रक्षक व एनटीसीए प्रतिनिधी अविनाश लोंढे, मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर, पशुवैद्यकीय अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) यांची प्रतिनिधी तसेच सातपुडा फाउंडेशनचे मंदार पिंगळे उपस्थित होते.
साहित्य व ट्रॅक्टर जप्त
कारवाईदरम्यान विद्युत प्रवाह सोडण्यासाठी वापरलेल्या १४ खुंट्या, २ किलो जीआय तार, एक पावडा, टू-कोर वापर तसेच वाघाच्या मृतदेह खेचण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर जप्त वनविभागाने जप्त केला.
वनविभाग व पोलिसांकडून स्वतंत्र तपास
अवैध शिकार संदर्भात वन गुन्हा दाखल करण्यात आला असून, तसेच अवैध विद्युत पुरवठ्याच्या प्रकरणी महावितरणकडून रामटेक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे आणि वन विभागाचे पथक पुढील तपास करीत आहेत.






