प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

0
54

२ आरोपी अटकेत; ११.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची मोठी कारवाई

केळवद २९ : महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ११.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळत होती. त्याअनुषंगाने २८ ऑगस्ट रोजी पथक केळवद पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की घुबडमेट मार्गे सावनेरकडे स्कॉर्पिओ वाहनातून सुगंधित तंबाखू आणली जात आहे.

पोलिसांनी मौजा शिल्पी शिवारातील लोहगट फाट्याजवळ नाकाबंदी केली. काही वेळातच स्कॉर्पिओ (क्र. MH-33/A-4514) पाढुर्णा कडून येताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावर वाहन चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन थांबवले.

वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये १५ वेगवेगळ्या कंपन्यांच्या १६२.९५८ किलोग्रॅम प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे पाकीट्स आढळले, ज्याची एकूण किंमत ₹१,६३,४५०/- आहे. या वाहनाची (स्कॉर्पिओ) किंमत अंदाजे ₹१०,००,०००/- असून दोन्ही मिळून ₹११,६३,४५०/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.मनिष मुरलीधर केवटे (वय ३७), रा. खडगाव रोड, वाडी, नागपूरतुषार उर्फ त्रिशूल सुरेश सिरसागर (वय ३७), रा. सोनबा नगर, वाडी, नागपूर या दोघांनीही महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मानवी आरोग्यास अपायकारक असूनही विक्रीच्या हेतूने वाहतूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी केळवद पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.