spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुन्हेगारांचा कर्दनकाळ हरपला; १५ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या ‘नॉटी’ला भंडारा पोलिसांची अखेरची सलामी

– क्रीडा स्पर्धेतही गाजवले मैदान; पोलीस दलावर शोककळा

इनसाइडर न्युज टुडे, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा पोलीस दलाची शान, गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि अनेक कठीण गुन्ह्यांचा छडा लावणारा निष्णात श्वान ‘नॉटी’ याचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या निधनामुळे भंडारा पोलीस दलातील एका अष्टपैलू सहकाऱ्याचा अंत झाला असून, संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी अत्यंत जड अंतःकरणाने आणि शासकीय इतमामात ‘नॉटी’ला शोक सलामी देऊन अखेरचा निरोप देण्यात आला.

‘नॉटी’चा जन्म ३० जानेवारी २०१५ रोजी झाला होता. आपल्या चपळाईने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा श्वान २६ डिसेंबर २०१५ रोजी अधिकृतपणे भंडारा पोलीस दलात दाखल झाला. त्यानंतर त्याने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात नऊ महिन्यांचे अत्यंत खडतर आणि विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या कौशल्यांचा वापर त्याने भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे केला.

आपल्या सेवाकाळात नॉटीने पोलिसांना मोलाची साथ दिली. त्याने अत्यंत चपळाईने तब्बल १५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले होते, तर इतर ३३ गुन्ह्यांच्या तपासात त्याने दिलेल्या दिशांमुळे पोलिसांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सोपे झाले. केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही नॉटीचे नाव आदराने घेतले जात असे. २०१८ आणि २०१९ मध्ये नागपूर येथे झालेल्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतही भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून त्याने सर्वांची मने जिंकली होती.

आज त्याच्या निधनानंतर भंडारा पोलीस मुख्यालयात अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भंडारा पोलिसांतर्फे त्याला सन्मानपूर्वक ‘शोक सलामी’ (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. या भावपूर्ण प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) आशिष गजभिये, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, भंडारा शहर पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी तसेच श्वान पथकातील सर्व अंमलदार उपस्थित होते. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नॉटीच्या पार्थिवावर पुष्पगुच्छ अर्पण करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

एका इमानी आणि कर्तबगार सहकाऱ्याच्या जाण्याने भंडारा पोलीस दलात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Popular Articles