वाचन प्रेरणा दिन दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषेचा विकास करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. त्यानिमित्याने सदर कविता
जोपासू वाचन संस्कृती
एक वाक्य एक ग्रंथ आयुष्ये फुलविती
जपू या वाचन प्रवृत्ती, जोपासू वाचन संस्कृती
लिहून गेले थोर शहाणे अनमोल गोष्टी
वाचनातून स्वानंद अन विचार समृद्धी
विपुल शब्दसंपदा, विस्तारे कल्पनाशक्ती
वाचन पठणाने वाणी-भाषा सुधारती… जपू या…
ताणातून सुटका, आत्मविश्वासात वृद्धी
पुस्तकातून ज्ञान अन ज्ञानातून संपत्ती
उदात्त अनुभव साऱ्या विश्वातून येती
मशागत बुद्धीची, त्यातून नवनिर्मिती… जपू या..
होऊन पुस्तक-मित्र करू वाचकांची स्तुती
धाकट्यास प्रेरणा थोरले पारायण करती
सुशिक्षित खरा जो लावी वाचनाची गोडी
सक्षम समाजास्तव ग्रंथची भेट देती… जपू या…
प्रा. विलास ध. डोईफोडे, सावनेर
*वाच रे पोरा*
वाच रे पोरा एखादं पुस्तक
वाच रे पोरा वाच!
वाचून आनंद मिळतो रे
विचार शाबूत होती रे
दूर करी अज्ञान
जीवाचे समाधान
उघड पुस्तकं वाच! वाच रे पोरा…
पठणाने वाणी उन्नत रे
अफाट कल्पनाशक्ती रे
असो आधुनिक युग
ठेव वाचनाची भूक
घेऊन पुस्तकं वाच! वाच रे पोरा…
ग्रंथ प्रदर्शनात येशी रे
वाचनालयात जाशी रे
वाचनाची गोडी
आयुष्य घडवी
जाऊन पुस्तकं वाच! वाच रे पोरा…
– प्रा. विलास ध. डोईफोडे,सावनेर




