spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संस्कार आणि विचार घडवतात सशक्त राष्ट्र – मिलिंद नारिंगे

-‘महाज्योती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

नागपूर :- राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवून स्वराज्याची पायाभरणी केली, तर स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण तरुणाईला आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजच्या पिढीने अंगीकारले तरच सक्षम समाज आणि सशक्त राष्ट्र उभे राहील, असे प्रभावी प्रतिपादन ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सोमवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मिलिंद नारिंगे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी ‘महाज्योती’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे आणि लेखाधिकारी  रश्मी तेलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना नारिंगे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्वाला राष्ट्रनिर्मितीचे अधिष्ठान असल्याचे सांगितले. राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या शिल्पकार होत्या. त्यांनी शिवरायांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रप्रेम, न्याय, शिस्त आणि लोककल्याणाची मूल्ये रुजवली, असे त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर भाष्य करताना मिलिंद नारिंगे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणाईला आत्मविश्वास, आत्मभान आणि राष्ट्रभक्तीचा मंत्र दिला. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका’ हा त्यांचा संदेश आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहे. युवकांनी केवळ नोकरीपुरते शिक्षण न घेता समाजपरिवर्तनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून चारित्र्यनिर्मिती, समता आणि मानवतेचे मूल्य अंगीकारल्यासच राष्ट्र सशक्त बनेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांचे संस्कारक्षम मातृत्व आणि स्वामी विवेकानंद यांचे विचारशील तत्त्वज्ञान हे आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचेही मिलिंद नारिंगे यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी ‘महाज्योती’चे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले, प्रकल्प अधिकारी पंकज पचारे, मयूर चव्हाण, विकास तिळगुळ यांच्यासह ‘महाज्योती’चे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.