spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

4 महिन्यांपासून मानधन रखडल्याने ‘लाडक्या बहिणीं’चा संताप; जिल्हा कार्यालयात महिलांच्या लांबच लांब रांगा

हंसराज, भंडारा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील महिलांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊनही मानधनाचे पैसे खात्यात जमा न झाल्याने संतप्त महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण असूनही अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे ‘अपात्र’ ठरत असल्याने लाभार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

तांत्रिक मुदत असूनही पैसे मिळेनात

शासनाने ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली होती , तर अर्जातील दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत वेळ देण्यात आली होती . असे असतानाही, अनेक महिलांच्या खात्यात गेल्या चार महिन्यांपासून एकही हप्ता जमा झालेला नाही. बँक खात्यात पैसे का येत नाहीत, हे विचारण्यासाठी महिला दररोज बाल कल्याण विकास कार्यालयात चकरा मारत असून तिथे महिलांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

जिल्ह्यातील १,१३४ महिलांनी लाडकी बहीण योजना स्वतःहून बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत. या महिला प्रामुख्याने ‘श्रावण बाळ’ किंवा इतर पेन्शन योजनांचा लाभ घेत आहेत. नियमानुसार एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येत नसल्याने, जुनी योजना सुरू ठेवण्यासाठी या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपात्रतेचा बसतोय फटका अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तरीही त्यांचे अर्ज ‘अपात्र’ दाखवत आहेत. यामध्ये ६५ वर्षांवरील महिला आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर (ITR) भरतात, अशा महिलांचे अर्ज सरसकट बाद केले जात आहेत. “आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा आहे, पण प्रशासन तांत्रिक कारणे पुढे करून आम्हाला वंचित ठेवत आहे, ITR आम्ही भरत आहो काय? गाडी काय आमच्या कडे आहे काय? ” अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली.

प्रशासकीय पेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात येणाऱ्या तक्रारींचा ओघ पाहता प्रशासनही हवालदिल झाले आहे. ज्या महिलांचे पैसे रखडले आहेत, त्यांच्या अर्जांची फेरतपासणी सुरू आहे. आधार लिंक नसणे किंवा डीबीटी (DBT) सक्रिय नसल्यामुळेही काही महिलांचे पैसे अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, 4 महिन्यांपासूनचा प्रलंबित हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles