– विशेष शिबिरांतून ३८३ नवीन दिव्यांग UDID साठी पात्र
– पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचा १०० टक्के विनियोग करण्याचे निर्देश
गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, उर्वरित तालुक्यांमध्ये विशेष दिव्यांग तपासणी शिबिरे आयोजित करावीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग कल्याणासाठी राखीव पाच टक्के निधीचा पूर्ण विनियोग करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण समिती तसेच नॅशनल ट्रस्ट अंतर्गत लोकल लेव्हल समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत UDID कार्ड, निरामय आरोग्य विमा योजना, पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी, विवाह प्रोत्साहन योजना, विशेष दिव्यांग तपासणी शिबिरे आणि संजय गांधी निराधार योजना आदींच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रलंबित UDID प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी UDID (Unique Disability ID) महत्त्वाचे असल्याने प्रलंबित नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. एकही पात्र दिव्यांग व्यक्ती UDID अभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भामरागड, सिरोंचा आणि चामोर्शी पंचायत समिती क्षेत्रात आयोजित विशेष दिव्यांग तपासणी शिबिरांमधून ३८३ नवीन दिव्यांग व्यक्ती UDID साठी पात्र ठरल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना तपासणी व नोंदणीची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी याच धर्तीवर जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्येही तातडीने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचा पूर्ण विनियोग करा
नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा १०० टक्के विनियोग करून त्याचा प्रत्यक्ष लाभ पात्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपलब्ध निधी अखर्चित राहणार नाही, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
विवाह प्रोत्साहन योजनेत पाच लाभार्थ्यांना लाभ
दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. गेल्या तीन महिन्यांत या योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उपलब्ध निधीचा १०० टक्के विनियोग करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
‘निरामय’ आरोग्य विमा योजनेचा लाभ पात्रांपर्यंत पोहोचवा
नॅशनल ट्रस्ट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या *‘निरामय आरोग्य विमा योजने’*च्या अंमलबजावणीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. पात्र दिव्यांग व्यक्तींना योजनेची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
तसेच तात्पुरते दिव्यांगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतील पात्र प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करून लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा समितीचे सदस्य-सचिव चेतन हिवंज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, समितीचे अशासकीय सदस्य पंकज भागडकर, संगीता तुमडे यांच्यासह संबंधित विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.





