spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केळापूर तालुक्यातील घरकुल योजनेंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

पांढरकवडा :- केळापूर (पांढरकवडा) तालुक्यात राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत केळापूर तालुका प्रेस क्लब, पांढरकवडा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती केळापूर यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील मोहदा, पाटणबोरी, टेंबी, रुंझा, उमरी, करंजी तसेच इतर गावांमध्ये काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरांचे बांधकाम पूर्ण न करता किंवा घर न बांधताच शासनाच्या घरकुल योजनेतील अनुदानाची रक्कम उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता इतरांच्या घरांची छायाचित्रे किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे अनुदानाचे हप्ते मंजूर करण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

या कथित गैरप्रकारांमुळे पात्र व गरजू लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहत असून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा इतर व्यक्तींचा सहभाग असल्यास त्यांचीही निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केळापूर तालुका प्रेस क्लबने प्रशासनाकडे तालुक्यात मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून बांधकामाची पडताळणी करावी, घर न बांधता किंवा अपूर्ण बांधकाम असतानाही अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करून चौकशी करावी, बोगस लाभार्थी आढळल्यास त्यांच्याकडून शासनाची रक्कम वसूल करावी, तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित व्यक्तींवर शिस्तभंगाची व आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यासोबतच संपूर्ण चौकशी स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा आणि जनहिताच्या दृष्टीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.