नागपूर, १० : कर्मचाऱ्यांचा संप आणि नागपूर जिल्ह्यातील मुसळधार पाऊस या दुहेरी संकटातही महावितरणने वीजपुरवठा अखंडित ठेवत आपली कार्यक्षमता आणि जनहिताची बांधिलकी सिद्ध केली. २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांच्या एकदिवसीय संपाचा आणि तीन दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीचा सामना करत, महावितरणने आपत्कालीन नियोजनाद्वारे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळवले.
महावितरणची सज्जता आणि व्यवस्थापन
संपादरम्यान महावितरणने प्रभावी नियोजन करत प्रादेशिक, परिमंडल, मंडल आणि विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित केले. प्रत्येक तासाला वीजपुरवठ्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जात होती.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मनुष्यबळाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. यात संपात सहभागी नसलेले कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी आणि कंत्राटदार यांना स्थानिक कार्यालये व उपकेंद्रांवर तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात आल्या. गरजेनुसार, अतिरिक्त मनुष्यबळाचीही मागणी केली गेली, ज्यासाठी आवश्यक वाहन व्यवस्था व इतर सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, वितरण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब यांसारख्या आवश्यक साधनसामुग्रीचा पुरेसा साठा विविध कार्यालयांमध्ये ठेवण्यात आला होता, आणि कंत्राटदारांनाही सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जीवनावश्यक सेवा आणि आव्हानात्मक परिस्थितीतील कार्य
महावितरणने घरगुती ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स आणि शासकीय कार्यालये यांसारख्या जीवनावश्यक सेवांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली. जिथे वीज खंडित झाली, तिथे त्वरित पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) पुरवठा सुरू करण्यात आला.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा आणि संपूर्ण विदर्भात पावसाने थैमान घातल्याने झाडे कोसळणे, सखल भागांत पाणी साचणे यामुळे वीज यंत्रणेला अनेक अडचणी आल्या. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळेही, महावितरणने सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी ‘तारेवरची कसरत’ करत प्रतिकूल परिस्थितीतही वीजपुरवठा अबाधित ठेवला. नागपूर शहरातील कॉंग्रेसनगर, महाल, गांधीबाग, बुटीबोरी आणि सिव्हिल लाईन्स विभागातील काही ३३ केव्ही वाहिन्यांना आणि वितरण रोहित्रांना पावसाचा फटका बसला. सखल भागात पाणी साचल्याने काही उपकेंद्रे व रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करावा लागला, पण तिथेही सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून पुरवठा सुरू झाला.
पुराच्या पाण्यातील दक्षता
मुसळधार पावसामुळे ३३ केव्ही नारा, सुतगिरणी, वाठोडा, कन्हान वॅटर वर्क्स आणि ११ केव्ही मानेवाडा उपकेंद्रात पाणी साचल्याने वीजपुरवठा सुरक्षेस्तव बंद करण्यात आला, जो पाणी ओसरल्यावर पूर्ववत झाला. हुडकेश्वर अंतर्गत पिपळा येथील कमल क्रिस्ट वसाहतीत पोहरा नदीचे पाणी वाढल्याने व मौदा उपविभागातील ३० गावांचा विद्युतपुरवठाही सुरक्षेच्या दृष्टीने बंद करावा लागला. काटोल, सावनेर व उमरेड विभागातही काही ठिकाणी पाणी साचल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या सर्व विपरीत परिस्थितीतही महावितरणने दाखवलेली कार्यक्षमता आणि जलद प्रतिसाद प्रशंसनीय आहे. नागरिकांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे ही कठीण परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली.
संपाला व्यापक समर्थन नाही
वीज कर्मचा-यांनी पुकारलेल्या या एकदिवसीय संपात नागपुर शहर मंडलात 43.62 टक्के, नागपूर ग्रामिण मंडलात 33.40 टक्के तर नागपूर परिमंडलातील 43.18 टक्के म्हणजेच जिल्ह्यातीत एकूण 40.06 टक्के कर्मचारी या संपाक सहभागी झाले होते.




