spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विकासकामांमुळे दारव्हा शहराचा कायापालट – पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे प्रतिपादन

– दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

यवतमाळ :- दारव्हा शहरातील विकासकामांमुळे शहराचे रुप बदलत असून कायापालट होत आहे. येणाऱ्या काळात दारव्हा शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी शुक्रवारी केले.

दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या लोकार्पण समारंभाला खासदार संजय देशमुख, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक थोरात, नगराध्यक्ष सुनील चिरडे, अधिक्षक अभियंता सुषमा बोंद्रे, उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅा.सिद्धेश्वर भोरे, तहसिलदार राजेश पौळ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, ठाणेदार शिवप्रकाश मुळे, नेरचे ठाणेदार अनिल बैराणी व दारव्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले की, दारव्हा शहरासाठी आनंदाचा क्षण, पोलीस प्रशासनासाठी सुसज्ज इमारत बांधण्याचा करण्याचा मानस होता. या इमारतीचे भूमीपूजन आणि लोकार्पण आमच्या हस्ते होणे हा विलक्षण क्षण आहे. १९१९ च्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ही इमारत होती. अपुऱ्या सुविधेत पोलीस प्रशासन सेवा देत होते. पोलीस स्टेशनच्या सुसज्ज इमारती झाल्या पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षकांचा पाठपुरावा होता. पालकमंत्री म्हणून दखल घेवून जिल्हा नियोजनच्या निधीमधून या पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीसाठी ११ कोटींचा निधी दिला. आज सुसज्ज इमारत उभी झाल्याचा आनंद आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत, सुरक्षित दारव्हा घडविण्याचा संकल्प करावा. या इमारतीला पोलीस स्टेशन नव्हे तर मंदीर असल्याची भूमिका ठेवून काम करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

दारव्हा शहरात विकासकामांचा धडाका

दारव्हाच्या विकासासाठी आतापर्यंत भरीव निधी दिला आहे. त्यामध्ये पंचायत समिती इमारतीसाठी १८ कोटी मंजूर केले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. उपविभागीय कार्यालयासाठी १५ कोटी रुपये दिले. विजेची समस्या सोडविण्यासाठी ३३ केव्हीच्या तीन उपकेंद्रांसाठी २५ कोटी मंजूर केले आहेत. ट्रान्सफॅार्मरसाठी १० कोटी दिले, नगरपरिषदेच्या माध्यमातून राज्यातील पहिले वृद्धाश्रम होणार असून त्यासाठी ५ कोटी मंजूर केले आहे. यासह अत्याधुनिक स्पोर्ट्स कॅाम्पलेक्ससाठी २० कोटी, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, टाऊन हॅाल, महामानवाच्या पुतळ्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे, छ. शिवाजी महाराज स्टेडियमसाठी ८ कोटी मंजूर केले. नवीन बचत भवन, सांस्कृतिक भवन, चौकांचे सौदर्यीकरण, नवीन व्यापारी संकुल, नाल्या, नवीन बस स्थानक बाधकामकामासाठी निधी दिला आहे, बेरोजगारांसाठी ५०० गाळे तयार करणार आहोत, महिलांच्या व्यवसायासाठी गाळे, महिलांसाठी पिंक टॅायलेट निर्माण करणार आहोत. दारव्हा शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा केली आहे. रिंग रोडच्या सर्व्हेसाठी निधी दिला आहे. दारव्हा शहरात डायलिसीस सेंटर सुरु झाले आहे. मॅाडर्न उपजिल्हा रुग्णालय करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विविध विकासकामांसह जिल्ह्यात सुसज्ज प्रशासकीय इमारती उभारल्या जात असल्याची माहिती पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी दिली.

पोलीसांसाठी निवासस्थान बांधणार

दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या पोलीसांसाठी येणाऱ्या काळात पोलीस निवासस्थान बांधणार येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी दिली. .

खासदार संजय देशमुख म्हणाले की, दारव्हा पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजनावेळी चांगली इमारत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती आज प्रत्यक्षात आली. कायदा व सुविधा राखण्यासह नागरिकांना चांगली वागणूक आणि चांगले वातावरण मिळण्याच्या दृष्टीने ही सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे. आता दारव्हा शहरवासियांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. दारव्हातील नागरिकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे, ती टिकवून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनीही मनोगत व्यक्त करुन पालकमंत्र्यांसह खासदारांचे आभार मानले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॅा.सिद्धेश्वर भोरे यांनी प्रास्ताविकात पोलीस स्टेशन इमारतीमधील सोयीसुविधांची माहिती दिली. तर ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांनी आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.