– भदंत सुरेई ससाई देणार धम्मदीक्षा
– बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात
नागपूर :- दर वर्षी प्रमाणे यंदाही पवित्र दीक्षाभूमिवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सलग तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात भिक्खू संघ उपासक, उपासिका, अनुयायी व श्रामणेर यांना दीक्षा देतील. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमिचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य सुरई ससाई यांनी प्रसार माध्यमांना दिली. यंदा दीक्षा घेणाऱ्या उपासकांचे प्रमाण अधिक असेल, असेही ससाई म्हणाले.
भदंत ससाई अनेक वर्षांपासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम दीक्षाभूमी येथे घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीतर्फे आणि भिक्खु संघाच्या सहकार्याने धम्मदीक्षेचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. दर वर्षी हजारो बांधव दीक्षा घेतात. उपासकांसाठी दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी असून येथून मिळालेली उर्जेमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे उपासक, उपासिका आणि अनुयायी मोठ्या प्रमाणावर येतात आणि धम्मदीक्षा घेतात.
दीक्षा कार्यक्रमाला भंते नागसेन, भंते नागावंश, भंते प्रज्ञाबोधी, भंते अश्वजित, भंते धम्मविजय, भंते महानागा, भंते कश्यप, भंते बुध्दघोष, भंते धम्मप्रकाश, भंते नागाप्रकाश, भंते मिलद, भंते धम्मशील, भंते संघ, कुशांतीनागा उपस्थित राहतील. पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करून उपासक उपासिकांना दीक्षा देतील. दरम्यान उपासकांना धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरित होईल.
एतिहासिक घटनेचे महत्व असलेल्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विविध राज्यातील आणि ग्रामीण भागातील हजारो उपासक, अनुयायी दीक्षा ग्रहन करतात. याशिवाय विदेशातील उपासक उपासिका ससाईंच्या हस्ते धम्म दीक्षा घेतात.




